आदित्य बिर्ला गटाची दमदार एन्ट्री: 5000 कोटींची ज्वेलरी ब्रँड ‘इंद्रिया’ लाँच

भारताच्या अग्रगण्य उद्योग समूह आदित्य बिर्ला ग्रुपने आता दागिन्यांच्या जगात पाऊल ठेवलं आहे. यासाठी त्यांनी 5000 कोटी रुपयांची गुंतवणूक करत ‘इंद्रिया’ ही ज्वेलरी ब्रँड लाँच केली आहे. यामुळे देशाच्या 6.7 लाख कोटी रुपये असलेल्या दागिन्यांच्या बाजारपेठेत एक नवीन स्पर्धा निर्माण होण्याची शक्यता आहे..

आदित्य बिर्ला ग्रुपला फॅशन आणि लाइफस्टाइल क्षेत्रात 25 वर्षांहून अधिकचा अनुभव आहे. या अनुभवाचा उपयोग करत कंपनीने ज्वेलरी सेक्टरमध्ये प्रवेश केला आहे. पुढील पाच वर्षांत इंद्रिया भारतातील टॉप तीन ज्वेलरी रिटेलर्समध्ये स्थान पक्के करेल, असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.

इंद्रिया ब्रँड अंतर्गत 15 हजाराहून अधिक डिझाइन्स असलेल्या दागिन्यांची विस्तृत रेंज ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यापैकी 5 हजाराहून अधिक डिझाइन्स एक्सक्लुझिव्ह असणार आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात दिल्ली, इंदोर आणि जयपूर या शहरांत इंद्रियाच्या स्टोअर्स सुरू करण्यात येणार असून पुढील सहा महिन्यांत देशातील इतर शहरांतही ब्रँडची पावले पडणार आहेत.

भारतातील वाढत्या मध्यमवर्गीय ग्राहक वर्गाची पसंती ब्रँडेड आणि ऑर्गनाइज्ड रिटेलकडे असल्याने इंद्रियाला चांगला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे. या क्षेत्रात टाटा आणि अंबानी यांसारख्या दिग्गजांशी स्पर्धा करावी लागणार असली तरी आदित्य बिर्ला ग्रुपच्या मजबूत ब्रँड इमेज आणि व्यापक नेटवर्कमुळे इंद्रियाला बाजारात चांगले स्थान मिळू शकते.

दागिन्यांच्या बाजारपेठेत नव्या खेळाडूची एन्ट्री झाल्याने ग्राहकांना अधिक पर्याय उपलब्ध होतील. त्यामुळे स्पर्धा वाढून ग्राहकांना फायदा होणार आहे. इंद्रियाच्या माध्यमातून आदित्य बिर्ला ग्रुप आपल्या पोर्टफोलिओत आणखी एक यशस्वी ब्रँड जोडण्याच्या दिशने वाटचाल करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *