जागतिक वाहन उद्योगातील दिग्गज कंपनी टोयोटा किर्लोस्कर मोटर (टीकेएम) महाराष्ट्राला मोठा गिफ्ट देणार आहे. कंपनी राज्य सरकारसोबत एका मोठ्या कराराला फायनल टच देत असून, २५ हजार कोटी रुपये गुंतवून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात नवीन वाहन उत्पादन केंद्र उभारण्याची तयारी आहे. या प्रकल्पामुळे राज्याच्या अर्थकारणाला मोठा चालना मिळणार असून, लाखो तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, अशी अपेक्षा आहे.
टोयोटाच्या या प्रकल्पातून दरवर्षी सुमारे चार लाख वाहने उत्पादित होण्याची शक्यता आहे. यात पेट्रोल-डिझेल वाहनांसह इलेक्ट्रिक वाहनांचाही समावेश असेल. भारतात इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरावर जोर दिला जात असताना टोयोटाचा हा निर्णय विशेष महत्त्वाचा ठरत आहे.
📍मुंबई
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 31, 2024
मराठवाड्याच्या विकासाचे नवे पर्व!
महाराष्ट्र शासन आणि टोयोटा किर्लोस्कर यांच्यात सामंजस्य करार pic.twitter.com/NchxlDbdBm
या प्रकल्पामुळे थेट आणि अप्रत्यक्षपणे सुमारे २४ हजार नवनवीन रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे बेरोजगारीच्या समस्यावरही या प्रकल्पामुळे काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र सरकारने वाहन उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना राबवल्या आहेत. त्याचाच परिणाम म्हणून टोयोटाने राज्याला निवडले आहे. या प्रकल्पामुळे राज्यातील वाहन निर्मिती क्षेत्राला मोठा चालना मिळणार असून, महाराष्ट्र देशातील वाहन उत्पादनाचे केंद्र बनण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे जाईल.
टोयोटाच्या या निर्णयामुळे राज्य सरकारही उत्साहित आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पाला सर्वतोपरी सहकार्य देण्याचे आश्वासन दिले आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक असलेली सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचेही सरकारने जाहीर केले आहे.
या प्रकल्पामुळे राज्याच्या अर्थकारणालाच नव्हे, तर संपूर्ण देशाच्या वाहन उद्योगालाही चालना मिळणार आहे. टोयोटाच्या या निर्णयाचा सकारात्मक परिणाम इतर वाहन उत्पादक कंपन्यांवरही होण्याची शक्यता आहे.