संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) आणि लार्सेन & टूब्रो (L&T) यांनी संयुक्तपणे विकसित केलेला आधुनिक लाइट टँक ‘झोरावर’ (Zorawar) सध्या चर्चेत आहे. जम्मू आणि काश्मीरमधील डोगरा सैनिक झोरावर सिंह यांच्या नावावरून या टँकचे नामांकरण करण्यात आले आहे. विशेषत: चीनच्या सीमेवर तैनातीसाठी डिझाइन केलेला हा लाइट टँक भारताच्या लष्करी क्षमतेत भर घालण्यास निश्चितच मदत करणार आहे.
India’s Indigenous light tank ‘Zorawar’ unveiled, fastest product development by DRDO, L&T
— DD News (@DDNewslive) July 6, 2024
As per DRDO chief Dr Kamat, the tank is expected to be inducted into the Indian Army by the year 2027 after all trials@DRDO_India #Zorawar pic.twitter.com/XBB8cnxqlE
हिमालयीन प्रदेशातील कठीण भागांमध्ये लढण्यासाठी ‘झोरावर’ टँक खास तयार करण्यात आला आहे. लेह-लडाखसारख्या उंचावरीच्या प्रदेशात सध्या तैनात असलेले T-90 आणि T-72 हे मुख्य युद्ध टँक अतिशय जड आहेत. त्यामुळे त्यांची चांगली मोबाईलिटी राखणे कठीण होते. मात्र, फक्त 25 टन वजनाचा असलेला ‘झोरावर’ हा लाइट टँक पर्वतीय प्रदेशात जलद आणि प्रभावी कारवाई करण्यास सक्षम आहे.
‘झोरावर’ची रचना करताना आधुनिक युद्धाच्या गरजा लक्षात घेण्यात आल्या आहेत. यामध्ये 105 मिमीचा तोफ, संरक्षणासाठी मिश्रधातूचा कवच, आणि विरळ हवेत देखील उत्तम कामगिरी करणारे शक्तिशाली इंजिन समाविष्ट आहे. त्याचबरोबर रिमोट कंट्रोल व्हीपन सिस्टम (RCWS) सारखी आधुनिक वैशिष्ट्येही यात समाविष्ट आहेत. हे वैशिष्ट्य युद्धभूमीवर धोका न करता शत्रूंवर हल्ला करण्याची क्षमता देते. याशिवाय, ‘झोरावर’ हा लाइट टँक जलाशयात तरंगण्यास देखील सक्षम आहे, ज्यामुळे सीमावर्ती भागातल्या नद्या आणि तळ्यांमधूनही तो सहजतेने जाऊ शकतो.
‘झोरावर’ सध्या प्रारंभिक टप्प्यात असून तो विविध चाचण्यांमधून जाणार आहे. या चाचण्यांमध्ये टँकची क्षमता, टिकाऊपणा आणि कार्यक्षमता यांचे मूल्यांकन केले जाणार आहे. चाचण्या यशस्वी झाल्यानंतरच भारतीय लष्करात ‘झोरावर’ची अधिकृतपणे सामील करण्यात येईल.
‘झोरावर’ हा लाइट टँक भारताच्या संरक्षण क्षेत्रात एक मोठी उपलब्धी आहे. फक्त 24 महिन्यांच्या आत विकसित झालेला हा टँक आधुनिक युद्धाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सक्षम आहे. जमीन सीमेवर भारतासमोर असलेल्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी ‘झोरावर’ निश्चितच हिरेचा ठेवा ठरेल. DRDO आणि L&T यांच्या या यशस्वी सहकार्यामुळे भारताचे संरक्षण क्षेत्र आणखी मजबूत होण्याची दिशा दिसत आहे.