मालदीवने घातली इस्राईल पासपोर्टवर बंदी!

पॅलेस्टाईन आणि इस्राईल यांच्यातील सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मालदीव सरकारने धक्कादायक निर्णय घेतला आहे. गाजा युद्धाच्या रागातून मालदीव सरकारने आपल्या देशात इस्तरायली नागरिकांना प्रवेशबंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे मालदीव्हला जाणार असलेल्या हजारो इस्त्रायली पर्यटकांवर थेट परिणाम होणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून इस्राईल आणि पॅलेस्टाईनमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या वृत्तांमुळे मालदीवमध्ये असंतोषाची लाट उसळली होती. बहुसंख्य मुस्लिम असलेल्या या देशात पॅलेस्टाईनच्या पाठिंब्याची लाट उसळली असून इस्त्रायली कारवाईंवर तीव्र संताप व्यक्त केला जात होता. याच संतापामुळे मालदीव सरकारने हा कठोर निर्णय घेतला असल्याचे दिसून येते.

मालदीव सरकारने केवळ प्रशासकीय आदेशांद्वारे नागरिकांना प्रवेश रोखण्याऐवजी थेट कायद्यात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे इस्त्रायली पासपोर्टधारकांना मालदीवमध्ये प्रवेश करण्यावर दीर्घकालीन बंदी येण्याची शक्यता आहे. तसेच या निर्णयामुळे मालदीव आणि इस्राईल यांच्यातील राजकीय संबंध बिघडण्याचीही शंका आहे.

मालदीव हे भारतीयांसह जगातील अनेक पर्यटकांसाठी लोकप्रिय स्थळ आहे. येथील निसर्गरम्य बेटं आणि आलिशान रिसॉर्ट जगभरात प्रसिद्ध आहेत. दरवर्षी हजारो इस्त्रायली पर्यटक मालदीवला भेट देतात. मात्र, या प्रवेशबंदीमुळे मालदीवच्या पर्यटन उद्योगाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

या प्रवेशबंदीनंतर इस्त्रायली सरकारने आपल्या नागरिकांना मालदीवला प्रवास करण्यापासून परावृत्त करण्याचा सल्ला दिला आहे. इतकेच नव्हे तर मालदीवमध्ये राहणाऱ्या इस्त्रायली नागरिकांनाही परतण्याची शिफारस करण्यात आली आहे. कारण अडचणींची परिस्थिती निर्माण झाल्यास त्यांना मदत करणे कठीण होईल, असे इस्त्रायली सरकारचे म्हणणे आहे.

मालदीव सरकारचा हा निर्णय किती काळ टिकणार याबाबत अद्याप स्पष्टता नाही. तसेच इस्राईल या निर्णयावर कशी प्रतिक्रिया देणार याकडेही जगाचे लक्ष आहे. परंतु, हा निर्णय इस्राईल-पॅलेस्टाईन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय राजकारणात चर्चेचा विषय ठरण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *