अभिनेत्री तमन्ना भाटिया यांना नुकत्याच झालेल्या आयपीएल २०२३ च्या अनधिकृत स्ट्रीमिंग प्रकरणी महाराष्ट्र सायबर सेलकडून चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आले आहे. या प्रकरणाने मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रात खळबळ उडवून दिली आहे. चला तर मग जाणून घेऊया या प्रकरणाबद्दल अधिक…
२०२३ च्या आयपीएल हंगामादरम्यान Fairplay नावाच्या App द्वारे काही लोकांनी सामन्यांचे अनधिकृत प्रसारण केले होते. या App चा संबंध महादेव नावाच्या ऑनलाईन बेटिंग प्लॅटफॉर्मशी असल्याचे समोर आले आहे. या अनधिकृत प्रसारणामुळे आयपीएलच्या अधिकृत प्रसारणकर्ता Viacom 18 ची मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानी झाली आहे, असा आरोप आहे.
महाराष्ट्र सायबर सेलने तमन्ना भाटिया यांना २९ एप्रिल रोजी चौकशीसाठी बोलावले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तमन्ना यांनी Fairplay App वरून आयपीएल सामने पाहण्यासाठी प्रमोशन केल्याचा आरोप आहे. मात्र, या प्रकरणात तमन्ना भाटियांची नेमकी भूमिका काय आहे, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. वृत्तांनुसार, त्यांना साक्षी म्हणून चौकशीसाठी बोलावण्यात आले असून त्यांनी या App चे थेट जाहिरातीकरण केले आहे की नाही, हे अद्याप सिद्ध झालेले नाही.
२९ एप्रिल रोजी तमन्ना भाटिया यांनी महाराष्ट्र सायबर सेलसमोर हजर राहून चौकशीला सहकार्य करणे अपेक्षित आहे. या चौकशी दरम्यान काय पुरावे समोर येतात आणि या प्रकरणाचा शेवट कसा होतो याकडे सर्वांचे लक्ष आहे.