पुण्याच्या तरुणाचा धमाकेदार राजीनामा! ढोलच्या तालावर नाचून घेतला बॉसचा निरोप

कामगार आणि मालकाच्या नात्यात अनेकदा वादविवाद होतातच. पण पुण्याच्या एका तरुणाने नोकरी सोडताना वेगळंच उदाहरण बसवलं आहे. त्याने ऑफिसच्या बाहेर ढोलवाले बोलावून थिरकून आपल्या बॉसचा निरोप घेतला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून तो चर्चेचा विषय ठरला आहे.

अनिकेत रंधीर (Aniket Randhir) असं या तरुणाचं नाव असून तो गेल्या तीन वर्षांपासून एका कंपनीमध्ये सेल्स असोसिएट म्हणून काम करत होता. मात्र त्याला त्यांच्या कामाची योग्य मिळत नव्हती. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या पगारात वाढ न करता त्यांच्याकडून अधिकाधिक कामाची अपेक्षा केली जात होती. तसेच बॉसकडूनही त्यांना काहीच आदर मिळत नव्हता. त्यामुळे त्यांनी या असह्य वातावरणात काम करण्यापेक्षा नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला.

नोकरी सोडताना अनिकेतने वेगळीच पद्धत अवलंबली. त्यांनी आपल्या मित्रांसोबत मिळून ऑफिसच्या बाहेर ढोलवाले बोलावले. त्यानंतर त्यांनी बॉससमोरच ढोलच्या तालावर जोरदार थिरकून आपला निरोप घेतला. या घटनेचा व्हिडीओ त्यांचे मित्र अनिश भगत (Anish Bhagat) यांनी सोशल मीडियावर शेअर केला. त्यांनी या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये “आजकालच्या कॉर्पोरेट जगतात टॉक्सिक वर्क कल्चर खूप वाढलं आहे. अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांचा आदर केला जात नाही.” असं म्हटलं आहे.

अनिकेतचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक जणांनी त्याच्या या धाडसी निर्णयाचं कौतुक केलं आहे. अनेकांनी आपल्याही कामाच्या ठिकाणी असह्य वातावरण असल्याचं सांगितलं आहे. तर काहीं जणांनी असा सनसनाटी राजीनामा देणं योग्य नसल्याचं मत व्यक्त केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *